नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील शहीद पोलीस अधिकारी बाबू राम यांना अशोक चक्र, तर शहीद कॉन्स्टेबल अल्ताफ हुसेन बट यांना कीर्ती चक्रने सन्मानित केले जाणार आहे. अशोक चक्र हा शांतता काळातील सर्वोच्च, तर कीर्ती चक्र हा दुसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात येणाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानुसार, राम आणि बट या जम्मू-काश्मीर पोलीस दलातील शहीद शूरवीरांना यथोचित सन्मान देण्यात आला आहे. जम्मू विभागातील पूँच जिल्ह्यात जन्मलेल्या राम यांनी बालपणापासूनच सशस्त्र दलांत भरती होण्याची आकांक्षा बाळगली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पोलीस दलात रूजू झाले. त्यानंतर ते अनेक दहशतवादविरोधी मोहिमांत सहभागी झाले.