विशेष : महानायक

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि अफाट लोकप्रियता लाभलेले चतुरस्र कलावंत म्हणून सुपरिचित असणारे अशोक सराफ ऊर्फ अशोक मामा यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. अशोक मामांची भेट ही आपल्याला समृद्ध करणारी असते. मराठी चित्रपटाच्या इतिहासातला अत्यंत मोठा चॅप्टर आपल्याला प्रत्यक्ष भेटतो. हिंदी चित्रपटात सर्व नायकांपेक्षा सहज भूमिका करताना जाणवतात ते आपले अशोकमामा.
अशोक सराफ सर हे नाव पहिल्यांदा कधी ऐकलं असं आठवायला लागलो. मी शाळेत असताना माझ्या आईने आम्हाला सायकलवरून विजय टॉकीजला ‘गोंधळात गोंधळ’ पाहायला नेले होते तो दिवस आठवला. दोन-चार महिन्यांतून एखादा चित्रपट पाहायला मिळायचा. तेव्हा आधीच्या जाहिरातीसुद्धा डोळे भरून बघितल्या जायच्या. याची गंमत आता एकाच वेळी नेटफ्लिक्सवर पिक्चर, हॉटस्टारवर मॅच आणि प्राइमवर फ्रेंड्स बघणार्यांना कळणार नाही.
‘एक डाव भुताचा’मधले अशोक सराफ तर इतके आवडले की नंतर बरेच दिवस मी बुरुं असा आवाज काढून मास्तुरेऽऽ असं म्हणत होतो. त्या चित्रपटानंतर डेक्कनवर खाल्लेला साधा डोसा आठवतो. साधा डोसा आणि अर्ध अर्ध गोल्ड स्पॉट मी आणि माझी बहीण, आईने नेहमीप्रमाणे त्याग करून फक्त इडली… लक्ष्या बेर्डे-अशोक सराफ यांनी धुमाकूळ घातलेला तो काळ. ‘धुमधडाका’मधले ‘वाख्या वुक्खहू’ वाले अशोक सराफ आणि मग ‘बनवाबनवी’मध्ये ‘हा माझी बायको’पासून ‘धनंजय माने इथेच राहतात का’ आणि ‘लिंबू कलरच्या साडीपासून ते कुणीतरी येणार येणार गं’पर्यंत सगळं तोंडपाठ झालं. अशोक मामांच्या मला सर्वात आवडणार्या भूमिकांमधल्या दोन भूमिका म्हणजे ‘कळत नकळत’मधला मामा आणि ‘चौकट राजा’मधला गणा’.
हिंदी चित्रपटात सर्व नायकांपेक्षा सहज भूमिका करताना जाणवतात ते आपले अशोकमामा. या महानायकाच्याबरोबर माझं नाव पडद्यावर बघताना झालेला आनंद मला आजही लक्षात आहे. ‘एक उनाड दिवस’मध्ये हुरहूर असते तीच उरी ऐकणारे अशोक सराफ आणि ‘निशाणी डावा अंगठा’मधले मुख्याध्यापक अशा काही चित्रपटांत मला गाणी करता आली हे किती मोठं भाग्य.
अलीकडच्या काळात श्रावणमाशी किंवा आनंदाने वेडेपिसे होणे म्हणत आपल्याला वेड लावणारे ‘एक डाव धोबीपछाड’मधले अशोकमामा अजूनही ‘पांडू हवालदार’मधलीच एनर्जी घेऊन वावरतात. ते भेटतात तेव्हा शांत, प्रांजळ, मिश्किल पण मोजकं बोलणारे असतात. मध्यंतरी, ‘झी’ने जीवनगौरव साजरा करताना सिद्धार्थ जाधवने इतका अप्रतिम परफॉर्मन्स केला की अशोक मामांना गदगदलेलं पाहिलं.
आमच्या ‘सारेगमप’मध्ये ते स्वतः आले होते. शूटिंग दरम्यान मला भेटून त्यांनी अभिनंदन केलं तेव्हा पाय पडलो आणि त्यांना सांगितलं- तुम्ही भेटलात की लहानपण भेटतं. शाळा… कॉलेज… साधा डोसा… आईची सायकल… सगळं पुन्हा भेटतं! मराठी चित्रपटाच्या इतिहासातला अत्यंत मोठा चॅप्टर आपल्याला प्रत्यक्ष भेटतो. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याचा आनंद शब्दातीत आहे. त्यांच्या समृद्ध अभिनय कारकिर्दीचा हा सन्मान आहे.





