Ashok Kharat | Shakta Pithas – भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात प्रकरणात तपासादरम्यान नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. खरातने पुणे, शिर्डी आणि नाशिकनंतर आता सोलापुरातही त्याने कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे उघड झाले आहे. प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्ग’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातील गट क्रमांक २००/१ मधील सुमारे ४.४८ हेक्टर (अंदाजे ११ एकर) जमीन खरातने स्वतःच्या नावावर घेतली आहे. Ashok Kharat २८ मार्च २०२४ रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये इतकी असल्याची माहिती आहे. या व्यवहारात त्याची पत्नी कल्पना खरातला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आले होते. कळमण परिसरात जमिनीचे बाजारभाव साधारण ५ ते ६ लाख रुपये प्रति एकर असताना खरातने तब्बल २१ ते २२ लाख रुपये प्रति एकर दराने जमीन खरेदी केल्याचे नोंदीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी महामार्ग प्रकल्पाची माहिती आधीच मिळवूनच ही गुंतवणूक करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाने खरातच्या कार्यालयाची पुन्हा झडती घेत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. झडतीदरम्यान विशिष्ट प्रकारच्या औषधाच्या बाटल्या, कुजलेले पेढे आणि सॅनिटायझरच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. न्यायवैद्यक अहवालानुसार या वस्तूंवर आणि कार्यालयातील केबिनच्या दरवाजाच्या आतील कडीवर खरातचे हातांचे ठसे आढळले असून, पीडित महिलांचे ठसे आढळले नसल्याची माहिती आहे.