Ashok Kharat : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) यांच्या विरोधातील तपासात एसआयटीला मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात (Ashok Kharat) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्यानंतर, एटीएस व एसआयटीच्या चौकशीत त्याचे अनेक काळे कारनामे समोर येत आहेत. महिलांवर अत्याचार, फसवणूक यासह आता आर्थिक घोटाळ्याचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने अनेक व्यक्तींचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडली. यामध्ये समता पतसंस्था व इतर पतसंस्थांमधील शेकडो खाती समाविष्ट आहेत. Ashok Kharat Case या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात हा नॉमिनी म्हणून नोंदवलेला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावानेही एक बँक खाते उघडण्यात आले असून, त्यातही अशोक खरात नॉमिनी असल्याची माहिती समोर आली आहे. १०० कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात स्वतःच या सर्व बँक खात्यांचे व्यवहार हाताळत होता. या माध्यमातून त्याने आतापर्यंत १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे आर्थिक व्यवहार केल्याचे सूत्रांनी सांगितले. कळस म्हणजे, ज्या खात्यांचा तो नॉमिनी आहे, त्या सर्व खात्यांशी त्याचाच मोबाईल नंबर लिंक केलेला आहे. यामुळे त्याला प्रत्येक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण होते. दरम्यान, या प्रकरणात दोन पतसंस्थांच्या चेअरमन आणि मॅनेजरची एसआयटीने चौकशी केली आहे. शिवानिका संस्थेच्या बँक खात्यांवर देखील कारवाई करण्यात आली असून, काही खाती सील करण्यात आल्याची माहिती आहे. रुपाली चाकणकर अडचणीत अशोक खरातसोबत (Ashok Kharat) रुपाली चाकणकर यांचे जवळचे फोटो आणि व्हिडिओ (पाद्यपूजा, छत्री धरणे) समोर आल्यानंतर त्यांना मोठी टीका सहन करावी लागली. अखेर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात खरात नॉमिनी असल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.