Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरण भोवलं ! बड्या व्यक्तीचा तडकाफडकी राजीनामा
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या काळ्या कारनाम्यांचे पडसाद आता राजकीय आणि सहकार क्षेत्रात उमटू लागले आहेत.

Ashok Kharat Case : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) याच्या काळ्या कारनाम्यांचे पडसाद आता राजकीय आणि सहकार क्षेत्रात उमटू लागले आहेत.
महिलांचे लैंगिक शोषण, भोंदुगिरी आणि कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या खरातच्या (Ashok Kharat Case) संपर्कात अनेक बड्या हस्ती असल्याचे उघड होत असतानाच, आता सहकार क्षेत्रातील एक मोठे नाव असलेल्या काका कोयटे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात खळबळ उडाली आहे.
समता पतसंस्थेचे कनेक्शन भोवले
समता पतसंस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सहकार नेते काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. २०१५ पूर्वीपासून ते या पदावर विराजमान होते.
राज्यातील सुमारे १५ हजार पतसंस्थांचे नेतृत्व करणाऱ्या या फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची वेळ त्यांच्यावर केवळ अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे आली आहे. अशोक खरात आणि समता पतसंस्थेचे आर्थिक लागेबांधे समोर आल्यानंतर सभासदांमधून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत होती, अखेर वाढत्या दबावामुळे त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.
१०० खात्यांचा ‘नॉमिनी’ आणि कोट्यवधींचे व्यवहार
तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात हा समता पतसंस्थेतील तब्बल १०० हून अधिक खात्यांवर ‘नॉमिनी’ (वारसदार) असल्याचे आढळले आहे.
या संशयास्पद खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. काका कोयटे हे खरातचे ‘भक्त’ असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. याच आर्थिक गुंत्यामुळे पतसंस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
काका कोयटे यांचे स्पष्टीकरण
मी भोंदू खरातचा (Ashok Kharat Case) भक्त नाही, कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही. नाशिकच्या पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमात खरात होता एवढच. समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरात नॉमीनी असलेल्या खात्यांची केवायसी करूनच ते उघडण्यात आले. जास्त खाती कोविड काळात ऑनलाईन उघडण्यात आली होती. जे खातेदार म्हणतायत आमचा संबंध नाही त्याचे पुरावे पोलिसांना देऊ असं स्पष्टीकरण काका कोयटे यांनी दिले आहे.
राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ
राज्य पतसंस्था फेडरेशन ही ६ हजार सभासद असलेली एक बलाढ्य संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदावरून एका मोठ्या नेत्याला अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागणे, हे अशोक खरात प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करते. आता पोलीस तपासात खरातचे आणखी कोणाकोणाशी संबंध उघड होतात आणि या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






