Ashok Kharat Case – नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट प्रशासकीय अधिका-यांपर्यंत आहेत, असा दावा करत अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत बड्या अधिका-यांची नावे जाहीर करत खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच या सर्वांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत, नावासह कोणाचे किती कॉल? अंजली दमानियांनी सर्वच सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अशोक खरात याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणा-या बड्या अधिका-यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी विविध फोटो पोस्ट करत मोठमोठे खुलासे केले आहेत. अशोक खरातला जिल्हाधिका-यासह तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि पोलिस अधिका-यांनी शेकडो वेळा दूरध्वनीवरून संवाद साधला, असे कॉल डिटेल्समधून समोर आले आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशोक खरातला ज्यांनी मदत केली याची माहिती समोर आणणे फार गरजेचे आहे. यात एक जिल्हाधिकारी आहेत ज्यांनी त्यांना खूप मदत केली होती. ते मुंबईत कार्यरत आहेत. आता मी त्यांचे नाव घेऊन सांगते अभिजीत भांडे पाटील असे त्यांचे नाव असून ते एसआरएमध्ये होते. त्यांना एसआरएमधूनही पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी आणले आहे. यांना खरेतर पदमुक्त करणे गरजेचे आहे. त्यांना काढून टाकणे गरजेचे आहे, असे दमानिया म्हणाल्या.