Ashok Kharat – लैंगिक अत्याचार आणि शोषणाच्या पाचव्या प्रकरणात भोंदू बाबा अशोक खरातला नाशिक येथील एका सुट्टीकालीन न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरातला शनिवारी पाचव्या प्रकरणात औपचारिकरित्या अटक करण्यात आली. या प्रकरणात त्याच्यावर काळ्या जादूचा वापर करून आणि स्वतःला ईश्वराचा अवतार भासवून पीडित महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. रविवारी पोलिसांनी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले आणि पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. खरातच्या वतीने बाजू मांडणारे वकील सचिन थोरे यांनी युक्तिवाद केला की, सर्व प्रकरणांचे स्वरूप सारखेच आहे आणि याच कारणास्तव पोलिसांना यापूर्वीच पुरेशी कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील कोठडीची आवश्यकता नाही. यावर सरकारी वकील शैलेंद्र बागडे आणि किरण बेंडभर यांनी युक्तीवाद केला की, प्रत्येक पीडित महिलेची कहाणी वेगळी आहे. हे गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून त्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्रपणे आणि सखोल चौकशी करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.