नवी दिल्ली – तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी (telangana election) कॉंग्रेसने (congress) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. चव्हाण आणि कर्नाटकचे मंत्री एन.एस.बोसेराजू यांची त्या निवडणुकीसाठी पक्षाचे विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेलंगणात यावेळी चांगली कामगिरी करण्याचा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे. त्या पक्षाने सत्तारूढ भारत राष्ट्र समितीसमोर मोठे आव्हान उभे केल्याचे मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर, विशेष निरीक्षकपदी नियुक्ती करून कॉंग्रेस श्रेष्ठींनी चव्हाण यांच्यावरील विश्वास अधोरेखित केला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसकडून माध्यमविषयक सज्जताही बाळगली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून तेलंगणात अजोय कुमार, मध्यप्रदेशात सुप्रिया श्रीनेत आणि छत्तिसगढमध्ये प्रमोद तिवारी यांना माध्यमविषयक निरीक्षक बनवण्यात आले आहे. छत्तिसगढमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान होईल. मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबरला, तर तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्या राज्यांसमवेत राजस्थान आणि मिझोरममधील निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी 3 डिसेंबरला जाहीर होतील.