Ashish Warang Death News: ‘सूर्यवंशी’ ते ‘सिम्बा’; अनेक हिट चित्रपटांमधून झळकलेले अभिनेते आशिष वारंग यांचे अकाली निधन

Ashish Warang Death News: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीस धक्का देणारी आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये विविध लक्षवेधी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मराठी अभिनेते आशिष वारंग यांचे वयाच्या ५५व्या वर्षी निधन झाले.
काही काळापासून ते आजारी होते, अशी माहिती समोर आली असून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शुक्रवारी (५ सप्टेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
आशिष वारंग यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या सहाय्यक भूमिका केल्या होत्या. ‘सूर्यवंशी’, ‘मर्दानी’, ‘सिम्बा’, ‘सर्कस’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या गंभीर, प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षक त्यांना नेहमी लक्षात ठेवतात.
View this post on Instagram
त्यांच्या कामगिरीची खास गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण, राणी मुखर्जी, कतरिना कैफ, रणवीर सिंग, जॉन अब्राहम यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले. चाहत्यांशी जवळीक राखणारे आशिष आपल्या इन्स्टाग्रामवर या कलाकारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असत.
अलीकडेच अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या कॅन्सरमुळे निधनाची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता आशिष वारंग यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
चित्रपटांत बहुतेक वेळा सहाय्यक भूमिका करूनही प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे आशिष वारंग आज नाहीत, मात्र त्यांचा ठसा उमटवणारा अभिनय कायमस्वरूपी चाहत्यांच्या आठवणीत जिवंत राहणार आहे.




