Maharashtra : मंत्री ॲड. आशिष शेलार यांची ‘ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन’च्या अध्यक्षपदी निवड; 52 कोटी गेमर्ससाठी पहिली मोठी घोषणा
Maharashtra : माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड. भारतातील ५२ कोटी गेमर्स आणि ई-स्पोर्ट्स क्षेत्रातील रोजगार व करिअरच्या संधींवर भर.

Maharashtra : इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची ‘ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन’ (ESGF)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण बैठकीत ही निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शेलार यांनी ई-स्पोर्ट्स क्षेत्र अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक करण्याचा निर्धार व्यक्त केला. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
ई-स्पोर्ट्सकडे केवळ मनोरंजन किंवा गेमिंग म्हणून न पाहता कौशल्य, शिस्त, प्रशिक्षण आणि करिअरची संधी असलेले क्षेत्र म्हणून त्याचा विकास करण्याचे आव्हान स्वीकारणार असल्याचे शेलार म्हणाले. मैदानी खेळांप्रमाणे ई-स्पोर्ट्समध्येही प्रावीण्य मिळवणारे खेळाडू तयार करण्यासाठी विविध राज्यांच्या फेडरेशनशी समन्वय साधला जाईल. तसेच केंद्र सरकारशी आवश्यक संवाद साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. भारतात सुमारे ५२ कोटी गेमर्स असून दररोज सुमारे ११ कोटी खेळाडू गेम खेळतात. देशात २८ प्रकारच्या खेळांच्या टूर्नामेंट होतात, तर हे सामने पाहणाऱ्यांची संख्या सुमारे ८ ते ९ कोटी आहे.
क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकीप्रमाणे ई-स्पोर्ट्समध्येही राष्ट्रीय संघ, निवड प्रक्रिया, स्पर्धा, प्रशिक्षण, नियम आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संरचित व्यवस्था उभारण्याचे काम ESGF करते. या क्षेत्राच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन तरुणांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी फेडरेशन कार्यरत आहे.
क्रिकेट, फुटबॉल, दोरीउड्या, दहिहंडी आणि साहसी खेळांसह विविध मैदानी खेळांच्या फेडरेशन व संघटनांवर काम करण्याचा दीर्घ अनुभव ॲड. आशिष शेलार यांना आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे देशातील ई-स्पोर्ट्स क्षेत्राला नवी दिशा आणि चालना मिळेल, असा विश्वास फेडरेशनने व्यक्त केला आहे.





