लेह/जम्मू : वरिष्ठ आयएएस अधिकारी आशीष कुंद्रा यांनी गुरुवारी लडाखच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. एजीएमयूटी कॅडरचे 1996 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या कुंद्रा यांनी बुधवारी निवृत्त झालेले आयएएस अधिकारी पवन कोटवाल यांच्याकडून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर कुंद्रा यांनी प्रभावी प्रशासन, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.संस्थात्मक यंत्रणा बळकट करणे, सेवा वितरण सुधारणे आणि विकास योजनांची वेळेत अंमलबजावणी हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे कुंद्रा यांनी सांगितले.लडाखच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे हे सर्वोच्च प्राधान्य राहील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या संकल्पनेनुसार सुलभ प्रशासनावर त्यांनी भर दिला. लडाखच्या नाजूक पर्यावरणाचा विचार करून शाश्वत विकास आणि हवामान बदलाशी सुसंगत धोरणे राबवली जातील, असे कुंद्रा यांनी स्पष्ट केले.