Ashadhi Wari : पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड! देहूनगरीत तयार होतोय आधुनिक ‘पालखी रथ’; काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Ashadhi Wari : कर्नाटकच्या दांडोलीतून आणलेल्या १५० घनफूट बर्माटीक सागवानाचा वापर; राजस्थानच्या कुशल कारागिरांनी कोरली रथावर देखणी कलाकुसर.

Ashadhi Wari – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी तयार होत असलेला अत्याधुनिक आणि आकर्षक नवीन पालखी रथ अंतिम टप्प्यात आला असून, यंदाच्या वारीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. पारंपरिक वारकरी संस्कृतीचे जतन करत आधुनिक तंत्रज्ञान, कलात्मकता आणि मजबुती यांचा संगम साधणारा हा रथ वारकरी संप्रदायासाठी एक ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शतकानुशतके चालत आलेल्या वारकरी परंपरेतील पालखी रथाला केवळ वाहतुकीचे साधन म्हणून नव्हे, तर श्रद्धा, भक्ती आणि संत परंपरेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे नवीन रथाच्या निर्मितीकडे राज्यभरातील लाखो वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले आहे. सध्या देहू नगरीत रथाचे अंतिम स्वरूप देण्याचे काम वेगाने सुरू असून, रथाच्या सौंदर्यामुळे तो भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
नवीन पालखी रथासाठी कर्नाटक राज्यातील दांडोली परिसरातून आणलेल्या उच्च प्रतीच्या बर्माटीक (सागवान) लाकडाचा वापर करण्यात आला आहे. रथ निर्मितीसाठी सुमारे १५० घनफूट दर्जेदार लाकूड वापरण्यात आले असून, त्यावर अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. या नक्षीकामामुळे रथाला पारंपरिक मंदिर स्थापत्याची झलक लाभली आहे.
रथावरील कोरीव काम राजस्थान राज्यातील सिरोही गावातील कुशल कारागिरांकडून करण्यात आले आहे. कोंढवा येथील स्वामी आर्टचे सुरेश मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तयार झालेले नक्षीकामाचे सुटे भाग नुकतेच देहू येथील मुख्य मंदिरात दाखल झाले आहेत. या कलाकुसरीत धार्मिक प्रतिके, सांस्कृतिक वारसा आणि दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
हवामानाचा विचार करत उपाययोजना
रथाच्या बांधकामात हवामानाचा विशेष विचार करण्यात आला आहे. पावसाळा, उन्हाळा किंवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूचा रथावर विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा रथ पुढील अनेक दशकांपर्यंत वारकरी सेवेत राहू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यंदाचा ३४१ वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा मंगळवारी,
दि. ७ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्याआधी नवीन पालखी रथाचे सर्व काम पूर्ण करून तो सेवेसाठी सज्ज करण्यात येणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे तसेच पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे यांनी दिली.




