Ashadhi Wari 2026 – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सर्व कामे तातडीने पूर्ण करून वारकर्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. देहू येथून निघणार्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी, आळंदी येथून निघणार्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच सासवड येथून प्रस्थान करणार्या संत सोपानदेव पालखी सोहळ्यांच्या मार्गावरील रस्ते, मुक्कामस्थळे आणि सोयीसुविधांचा आढावा घेताना त्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील ईनामदार वाडा परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करावी. देहू कॅन्टोन्मेंट हद्दीतील खराब रस्त्यांची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत, कॅन्टोन्मेंट बोर्डाची नाहरकत घेऊन तातडीने करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आकुर्डी येथील पालखी मुक्कामासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. लोणी काळभोर येथील पालखी मुक्कामाची तयारी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असून, जर्मन हँगर, पाणी टँकर आणि स्वच्छता व्यवस्था गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणांनी पालखी तळावरील व्यवस्थापन जबाबदारीने पार पाडावी, असेही निर्देश देण्यात आले. नीरा नदीत पालखी आगमनाच्या दोन दिवस आधी पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत. जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी पुणे. संत सोपानदेव पालखी सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्त, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. आळंदी येथे नवीन भक्ती सोपान पुलाची उंची वाढविणे तसेच दर्शन बारीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आळंदी ते पिंपरी-चिंचवड हद्दीपर्यंतच्या सुमारे 700 मीटर रस्त्यापैकी केवळ 100 मीटर रुंदीकरणाचे काम शिल्लक असून ते लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दिवे घाट परिसरात वारीदरम्यान बॅरेकेटिंग व रस्त्यालगत विजेची व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. वारकर्यांच्या आरोग्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज संस्थानांना प्रत्येकी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आळंदी येथील दर्शनबारी परिसरात सुरक्षिततेसाठी सुमारे 180 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापनासाठी समन्वय साधण्यासाठी डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी, आळंदी व संत सोपानदेव संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. “पालखी सोहळा हा जगातील सर्वात शिस्तबद्ध धार्मिक सोहळा असून रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वारकर्यांना उत्तम सुविधा द्याव्यात.” – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी