Ashadhi Wari 2026: आषाढी एकादशीचा सोहळा २५ जुलै २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उत्तम सुविधा पुरवण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आषाढी वारी नियोजन बैठक रस्ते दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांचे नियोजन – जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्पष्ट केले की, श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांसह इतर संतांच्या पालख्यांसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील रस्त्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती पूर्ण करावी. पालखीतळ आणि विसाव्याच्या ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा आणि पुरेशी शौचालये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. हेही वाचा – महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा; ‘या’ 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट आरोग्य आणि अन्न सुरक्षेवर भर – वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांच्या दुकानांची कडक तपासणी करावी. ‘फूड सेफ्टी ऑन व्हील’ या मोबाईल व्हॅनची संख्या वाढवून भेसळ व विषबाधेबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारीच्या काळात आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी १० टक्के बेड आरक्षित ठेवावेत, असे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. सुरक्षा व्यवस्थेचे ‘हायटेक’ नियोजन – भक्तांच्या सुरक्षेसाठी वाखरी, भक्ती सागर (६५ एकर), चंद्रभागा वाळवंट, दर्शन मंडप आणि मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जाणार आहे. या सर्व कॅमेऱ्यांची ऑपरेटिंग सिस्टीम एकाच मध्यवर्ती ठिकाणी असेल, ज्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. प्रशासकीय तयारीचा आढावा – बैठकीत प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सादरीकरणाद्वारे (PPT) प्रशासनाच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि मंदिर समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या दर्शन रांगेतील सुविधांचा प्रामुख्याने समावेश होता.