Ashadhi Wari 2025: संत गजानन महाराज पालखीचे 12 जूनला मराठवाड्यात आगमन

हिंगोली: श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे १२ जून, गुरुवारी मराठवाड्यात आगमन होणार आहे. मराठवाडा-विदर्भ सीमेवरील पानकनेरगाव येथे दुपारी पालखीचे जल्लोषात स्वागत होईल, तर सायंकाळी सेनगाव येथे मुक्काम राहील. सेनगावकरांतर्फे वारकऱ्यांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या ५५ वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथून संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघते. यंदा २ जूनपासून अकोला, पातूर, श्री क्षेत्र डव्हा, शिरपूर जैन, मसला, रिसोड मार्गे ही पालखी १२ जून रोजी पानकनेरगाव येथे दुपारी पोहोचेल. सायंकाळी सेनगाव येथे मुक्कामादरम्यान परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था असेल. १३ जून रोजी सकाळी ४ वाजता श्रींच्या आरतीनंतर पालखी श्री क्षेत्र नर्सी (नामदेव) कडे मार्गस्थ होईल.
या सोहळ्यात ७०० वारकरी सहभागी आहेत. यामध्ये अश्व, भगव्या पताका धारण केलेले वारकरी, तसेच श्री क्षेत्र संस्थानचे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आणि फिरते दवाखाने उपलब्ध असतील. सेनगाव तालुक्यात ठिकठिकाणी पालखीचे उत्साहात स्वागत होईल, तसेच वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, पाणी आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल. हा सोहळा भाविकांमध्ये भक्ती आणि उत्साहाचा संचार करणारा ठरेल.





