सासवड : श्री संत सोपानकाका महाराज यांचा पालखीसोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे २३ जून रोजी सासवड येथील देऊळवाड्यातून दुपारी ११ वाजता प्रस्थान ठेवणार आहे. याचवेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी असतो. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सासवड येथे माॅक ड्रील घेण्यात आले. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. सासवड पोलीस स्टेशन, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), जलद प्रतिसाद पथक (QRT) आणि दहशतवादी विरोधी पथक (ATB) यांनी संयुक्तपणे मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पाडली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा सराव झाला. मंदिरात दोन संशयित अतिरेकी लपल्याची गोपनीय माहिती सासवड पोलीस स्टेशनला मिळाल्यावर प्रभारी अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांनी तातडीने पथक सक्रिय केले आणि पुणे ग्रामीण नियंत्रण कक्षाला कळवले. अवघ्या काही मिनिटांत सासवड पोलीस, QRT, BDDS, दहशतवादी विरोधी पथक आणि ड्रोन पथक मंदिर परिसरात दाखल झाले. भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढून परिसर सील करण्यात आला. QRT पथकाने मंदिराचा ताबा घेऊन शोधमोहीम राबवली आणि दोन अतिरेक्यांची उपस्थिती निश्चित केली. मंदिराबाहेर स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्याची माहिती मिळताच BDDS पथकाने तपासणी करून वॉटर डिसरप्टरद्वारे ती निष्क्रिय केली. अग्निशमन दलाने परिसर पाण्याने स्वच्छ केला. QRT पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सदर मॉक ड्रिलचे प्रत्यक्षिक पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल यांचे मार्गदर्शनाखाली सासवडचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप शिंदे, सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश अधिकारी, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे सपोनि संतोष साळुंके, क्यू.आर.टी. पथकाचे सपोनि कारंडे, दहशतवादी विरोधी पथकाचे सपोनि प्रकाश पवार तसेच बॉम्ब पथक अंमलदार सहा. फौजदार राजु जढर, पो. हवा सतिश गेंगजे, पो.हवा गणेश फापाळे, चंद्रशेखर मगर, ड्रोन पथकाचे संदिप जगताप क्यु.आर.टी. पथकाचे पो.हवा राणा, पोशि धायगुडे, अक्षय जावळे, गाडे, भोर, पाकिरे, मुंडे, दहिफळे, शेख, मुळे, बटुळे ओ.टी.बी पथकाचे विशाल गव्हाणे, विशाल भोरडे, रविंद्र जाधव, ओंकार शिंदे यांनी उकृष्ट कामगीरी केली.