Ashadhi Wari 2023 : वारीतील प्रत्येक दिंडीला 50 हजार रुपये द्या; काँग्रेसची सरकारकडे मागणी

मुंबई : – आषाढी वारीच्या निमित्ताने ठिकठिकाणाहून वारकरी दिंड्या घेऊन निघाले आहेत. टाळ-मृदुंगाच्या तालात वारकरी भजन-किर्तनात दंग होतात. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या निधीतून प्रत्येक दिंडीला 50 हजार रुपये द्यावेत,अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, पंढरपूर वारीची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव नसलेली समाजासमोर एक आदर्श निर्माण घालून देणारी ही वारी पंरपरा आहे.
दरवर्षी जगतगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसह इतर पालख्या पंढरपूरकडे जात असतात. या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने अबाल-वृद्ध भक्तीरसात तल्लीन होत असतात.
पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे कार्यही होत असते.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या निधीतून प्रत्येक दिंडीला 50 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.





