भाऊ ठाकूर राहू -दौंड तालुक्यात महावितरण व शेतकरी यांच्यात कृषीपंपाच्या वीज बिल थकबाकीवरून वीज तोडणी केली जात आहे. त्यामुळे संघर्ष उफाळून आला आहे. गेल्या दोन महिन्यापासून तालुका आंदोलने, निवेदने, मोर्चाने वातावरण तापले आहे. या संघर्षात लाईनमनचे हाल होत आहेत. दुरूस्तीसाठी विद्युत पोलवर लाईनमन काम करीत असल्यास शेतकरी त्याला उतरवित आहेत. तसेच काही शेतकरी त्याला पुन्हा काम करण्यास सांगत आहेत. त्यामुळे चढ खांबावर… उतर खाली, अशी अवस्था लाईनमनची झाली आहे. दौंडसह जिल्ह्यात अनेक शेतकरी संघटनांनी महावितरणविरोधी आंदोलने केली. परंतु त्याला दाद मिळाली नाही. बऱ्याचवेळा वरिष्ठ पातळीवरून महावितरणचा आदेश आला की, लाईनमनला वीज जोडणीची कामे करावी लागत आहे. काही शेतकरी हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी इकडून तिकडून पैसे गोळा करून वीज बील भरत आहेत. बिल भरल्यानंतर लाईनमन वीज जोडणीची कामे करून देत आहेत. महावितरणने वसुलीसाठी कडक भूमिका घेतली. तेव्हा सुरवातीच्या काळात प्रत्येक गावात ट्रान्सफॉर्मर लाईनमनने बंद केले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे लगेच ट्रान्सफॉर्मर जोडण्याचे आदेश महावितरणने दिले. परंतु बागायती भागात एका गावच्या शिवारात कमीत कमी चाळीस ते पन्नास ट्रान्सफॉर्मर आहेत. हे सर्व ट्रान्सफॉर्मर लगेच जोडणे शक्य नसते, परंतू शेतकरी थांबण्यास तयार नसतात. ठराविक शेतकऱ्यांनी बिले भरल्यामुळे त्यांना नियमानुसार प्रत्येक ट्रान्सफॉर्मर जोडणे गरजेचे आहे. खरी कसरत येथूनच सुरू होते. एका ट्रान्सफॉर्मरवरील चार शेतकऱ्यांनी बिल भरले असेल तर राहिलेले तीस ते पस्तीस वीज जोड लाईनमनला प्रत्येक खांबावर चढून तोडावे लागत आहेत, असा हिशेब चाळीस ट्रान्सफॉर्मवरबाबत आहे. हे काम लाईनमन करीत आहेत. लाईनमन काम करीत असताना काही शेतकरी त्यांना विद्युत पोलवरून उतरवित आहेत. त्यानंतर बिल भरलेले शेतकरी लाईनमनला पुन्हा खांबावर दुरुस्ती, जोडणीसाठी जाण्यास सांगत आहे. यात लाईनमन चढ खांबावर… उतर खाली…, अशी विचित्र कोंडीत अडकला आहे. हे चित्र दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरात सरार्स सुरू आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता काही ठिकाणी दोन गावांमध्ये एक लाईनमन आहे. त्यामुळे वेळेत काम करण्यास अडचणी येत आहेत. यात वादवादीचा देखील प्रसंग येत आहे. तक्रारींचा सूर उमटत आहे. ही समस्यांची बाजू असताना दुसरीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसंपासून लाईनमनच्या मदतीसाठी कंत्राटी पद्धतीने एक मदतनीस दिला आहे. त्यामुळे कामाचा ताण थोड्याप्रमाणात कमी होत आहे.