भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना मिळाली पोलिसांची नोटीस; नेमकं काय घडलं?

Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांनी जोर धरला आहे. विविध भागात दिग्गज नेतेमंडळींच्या सभा सुरू आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही सोलापूरात प्रचार सभा घेतली. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवर पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. त्यामुळे ओवैसी यांच्या सोलापूरमधील या सभेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला बुधवारी खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. त्यावेळी ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही अशी प्रक्षोभक भाषा वापरू करू नये, अशी पोलिसांनी नोटीस दिली. भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे पोलिसांनी ही नोटीस दिली आहे.
इंग्रजीत नोटीस मागितली
खासदार ओवैसी यांना दिलेली नोटिस ही मराठी असल्याने त्यांनी नोटीसचा मोबाईलमध्ये फोटो काढला. नंतर त्या नोटीसची इंग्रजीत प्रत मागवली. यावेळी नोटीसीची इंग्रजीतील प्रत आणण्यासाठी पोलिस परत गेल्याचं दिसून आलं. यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी इंग्रजीतून आलेली नोटीस जाहीरपणे वाचताना त्यातील चुकाही दाखवल्या.
सोलापूर मध्यमध्ये काँग्रेसला धक्का
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठण यांनी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. शौकत पठाण हे स्वतः सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र काँग्रेसने शौकत पठाण यांना उमेदवारी नाकारल्याने ते काही दिवसापासून नाराज होते.
देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
“लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळे भाजपचा अनेक जागांवर पराभव झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण मग अयोध्येतही तुमचा पराभव कसा झाला? तिकडे तुम्हाला मतं का मिळाली नाहीत. देवेंद्र फडणवीस सातत्याने ‘व्होट जिहाद’, ‘धर्मयुद्ध’, असे शब्द बोलत असतात. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही का? फडणवीस तुम्ही काही आमदार विकत घेतले, मग तुम्हाला चोर किंवा दरोडेखोर म्हणावे का? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना ते रोखण्याची तुमची हिंमत झाली नाही का?,” असा सवालही ओवैसी यांनी फडणवीस यांना केला. तुम्ही निवडणुकांकडे हिंदू मुस्लिमांची लढाई म्हणून बघू नका. महागाईच्या विषयाबद्दल बोला, असेही ते म्हणाले.
हेही वाचा:
Jalgaon News : गरोदर महिलेला नेत असताना एम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट





