Asaduddin Owaisi : भारतीयांनी शत्रुच्या जाळ्यात अडकू नये; ओवेसींचे आवाहन

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केवळ काश्मिरीच नाही तर देशभरातील मुस्लिम संघटना आणि नेते निषेध करत आहेत. दरम्यान, गुरुवारी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही देशभरातील मुस्लिमांना आवाहन केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मदतीसाठी आवाहन करणारा एक व्हिडिओ असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवर पोस्ट केला. त्यात ते म्हणाले की तुम्हा सर्वांना माहिती आहेच की पहलगाममध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी २७ हून अधिक लोकांची हत्या केली आहे आणि अनेक जखमी लोक रुग्णालयात आपल्या जीवासाठी झुंजत आहेत.
या दहशतवाद आणि क्रूरतेविरुद्ध मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की उद्या शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी जाताना तुम्ही हातावर काळी पट्टी बांधा, जेणेकरून आपण एकत्रितपणे संदेश देऊ शकू की आपण भारतीय परदेशी शक्तींना देशाची शांतता आणि एकता कमकुवत करू देणार नाही. या हल्ल्यामुळे दुष्टांना आपल्या काश्मिरी बांधवांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. मी सर्व भारतीयांना शत्रूच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन करतो.
ओवेसी पुढे म्हणाले, आम्ही दहशतवाद्यांच्या या कृत्याचा निषेध करतो. आम्ही या दहशतवाद्यांना इस्लामच्या नावाखाली लोकांना मारण्याची परवानगी कधीही देऊ शकत नाही. बाहेरील शक्ती येऊन आपल्या देशवासीयांचे जीव घेतील हे आपण कधीही सहन करू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा निषेध केला पाहिजे. पहलगाम हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत असदुद्दीन ओवेसीही सहभागी झाले होते.





