satara | आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय यंत्रणा सतर्क

सातारा, (प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच, देशात आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील सातारा, माढा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, हातकणंगले उस्मानाबाद लातूर आणि रायगड या मतदारसंघांमध्ये तिसर्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे.
जिल्ह्यात शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, हे सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमधील प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा उद्या, दि. 17 रोजी घेणार असून, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे
सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा-जावळी, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, कोरेगाव व पाटण विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आचारसंहिता दुपारी 3 वाजता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अध्यादेश सर्व विधानसभा मतदारसंघांमधील प्रांताधिकार्यांना निर्देशित केला. सर्व प्रस्तावित विकासकामांची मंजुरी, नवीन प्रस्तावित कामे, बदल्यांचे प्रस्ताव आणि इतर शासकीय सोपस्कार आता प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.
शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा निवडणूक विभागाची तातडीची बैठक जिल्हाधिकार्यांनी रविवारी (दि. 17) बोलावली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, याचा सस्पेन्स आचारसंहिता लागू झाल्यानंतरही कायम आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उदयनराजे भोसले हे त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले होते.
मात्र त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन, भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीबरोबर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेत पाठवले.
आता महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्याच वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनीही उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
या राजकीय नाट्याचा क्लायमॅक्स येत्या दोन दिवसांत होण्याची चिन्हे आहेत, सातारा व माढ्यात 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, 20 एप्रिल रोजी छाननी होणार आहे. 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, 7 मे रोजी मतदान होणार आहे. हा कार्यक्रम लक्षात घेऊन राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.





