लॉकडाऊन घोषित होताच ‘या’ देशात लागल्या ७०० किमी लांब वाहनाच्या रांगा

पॅरिस : एकीकडे दहशतवाद आणि दुसरीकडे करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे फ्रान्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण आहे. यादरम्यान देशात दुसरा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीपासून लॉकडाउनच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आणि देशातील जवळपास ६.७ कोटी लोकांना डिसेंबपर्यंत बंधनात राहावं लागणार आहे. यामुळेच गुरुवारी संध्याकाळी पॅरिसच्या रस्त्यांवर आणि आजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार, पॅरिसमध्ये आणि आसपास असणाऱ्या परिसरातील वाहतूक कोंडी किमीमध्ये मोजल्यास जवळपास ७०० किमी लांब वाहतूक कोंडी झाली होती. याचे सर्वात मोठं कारण म्हणजे हा लॉकडाउन एक महिन्यांसाठी लागू असणार आहे. यामुळेच गुरुवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन प्रभावी होण्याआधी सामान खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. याशिवाय विकेण्ड आल्यानेही अनेक लोक इतर ठिकाणी असणाऱ्या आपल्या घऱी जाण्यासाठी निघाले होते. यामुळेच ही स्थिती निर्माण झाली होती.
फ्रान्समध्ये २४ तासात करोनाचे ४७ हजार ६३७ रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १३ लाख २७ हजार ८५२ इतकी झाली आहे. करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोनामुळे आतापर्यंत ३६ हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान लॉकडाउनदरम्यान जे लोक घरुन काम करु शकत नाहीत त्यांना कामासाठी बाहेर जाण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी तसंच वैद्यकीय कारण आणि व्यायामासाठी एक तासासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी असेल.





