Jamkhed : ’कलेक्टर व्हायचंय’ म्हणताच साहेबांनी घडवली स्वतःच्या लाल दिव्याच्या गाडीची सफर!
Jamkhed : शाळेतील समाधान आणि समर्थ या विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाल्याचे समजताच हिंगे यांनी त्यांची विशेष आस्थेवाईक चौकशी केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट समाधानच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली.

जामखेड :“तुम्हाला काय बनायचंय?” या प्रश्नावर ग्रामीण भागातील चिमुरड्यांनी “आम्हाला कलेक्टर बनायचंय,” असे उत्तर देताच, अहिल्यानगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना स्वतःच्या लाल दिव्याच्या गाडीतून सफर घडवून आणली. देवदैठण (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धनगरवस्ती येथे घडलेल्या या हृदयस्पर्शी प्रसंगाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे डोळे पाणावले. कोणत्याही शासकीय प्रोटोकॉलशिवाय अत्यंत साधेपणाने तब्बल तीन तास शाळेत रमलेल्या हिंगे यांनी अधिकाऱ्याच्या संवेदनशीलतेचे अनोखे दर्शन घडवले.
अहिल्यानगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी देवदैठण येथील धनगरवस्ती जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट दिली. शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवताच त्यांनी स्वागतासाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांसोबत चक्क लेझीमवर ठेका धरत वातावरण उत्साही करून टाकले. स्वतः जिल्हा परिषद शाळेतून शिकून उच्चपदावर पोहोचलेल्या हिंगे यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांशी थेट नाळ जोडली.
शाळेतील समाधान आणि समर्थ या विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाल्याचे समजताच हिंगे यांनी त्यांची विशेष आस्थेवाईक चौकशी केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट समाधानच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. “विद्यार्थ्यांच्या कोणत्याही गरजा असतील तर मला हक्काने कळवा, मी त्या नक्की पूर्ण करेन,” असा विश्वास त्यांनी शिक्षकांना दिला.
दुष्काळामुळे सत्कार नाकारला; जमिनीवर बसून जेवले
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून हिंगे यांनी कोणताही औपचारिक सत्कार स्वीकारण्यास नकार दिला; मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेला पुष्पगुच्छ त्यांनी प्रेमाने स्वीकारला. यानंतर त्यांनी शाळेचा परिसर, ग्रंथालयातील पुस्तके आणि किचन शेडच्या स्वच्छतेची पाहणी करत समाधान व्यक्त केले. तसेच, शाळेच्या व्हरांड्यात विद्यार्थ्यांच्या पंगतीत जमिनीवर बसून शालेय पोषण आहाराचा आस्वादही घेतला. यावेळी उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापक लहु बोराटे यांनी शाळेबद्दल माहिती दिली लोकसहभागातून शाळेचा कसा कायापालट झाला हे पाहून जिल्हाधिकारी अवाक् झाले
विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांनी त्यांच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल विचारले. मुलांनी ‘कलेक्टर’ होण्याची इच्छा व्यक्त करताच, हिंगे यांनी शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना गटागटाने आपल्या शासकीय गाडीत बसवून सफर घडवली. लाल दिव्याच्या गाडीत बसल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि निरागस उत्साह पाहण्यासारखा होता.
याप्रसंगी मंडल अधिकारी श्री. शिरसाट, श्री. काळे, तलाठी, ग्रामसेवक भाऊसाहेब, पालक आप्पा वाघमारे, बाळासाहेब चिलगर उपस्थित होते. सहशिक्षक विकास सौने यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. शाळेच्या या प्रगतीमागे तहसीलदार शितलकुमार सावळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. खताळ आणि केंद्रप्रमुख केशव गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे आदर्श शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक लहु बोराटे यांनी सांगितले.





