भाजपने उमेदवारी यादी जाहीर करताच केली रद्द; अखेर नव्याने 15 उमेदवारांची घोषणा

Jammu Kasmir Election 2024 | जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवरून आज नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी भाजपने सर्वात आधी सकाळी 10 वाजता एकूण 44 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात तीनही टप्प्यातील उमेदवारांची नावे होती.
मात्र अवघ्या दोन तासांनंतर भाजपने ही यादी मागे घेतली. काही दुरुस्त्या करून ही यादी पुन्हा जाहीर केली जाईल, असे भाजपने म्हटले आहे. या घोषणेनंतर तासाभराने भाजपने पुन्हा सुधारित यादी जाहीर केली. त्यात भाजपने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांसाठी जाहीर केलेले उमेदवार अवैध ठरवून पहिल्या टप्प्यातील केवळ 15 नावांना मंजुरी दिली.
नेमकं काय घडलं?
तीन टप्प्यात होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी पहिल्या 44 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र तब्बल दोन तासांनंतर भाजपने ही यादी मागे घेतली. यानंतर भाजपने पहिल्या टप्प्यासाठी केवळ 15 उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे नव्हती. प्रत्यक्षात 44 उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यात माजी उपमुख्यमंत्री निर्मल यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे यात काहीशी सुधारणा केल्याचे पाहायला मिळत आहे.
BJP releases amended list of 15 candidates for upcoming J&K Assembly elections pic.twitter.com/yUzU6lYrTB
— ANI (@ANI) August 26, 2024
या सुधारित यादीत भाजपने एका महिला उमेदवाराला आणि एका काश्मिरी पंडितला तिकीट दिले आहे. भाजपने काश्मीर खोऱ्यातील शांगस-अनंतनाग पूर्वेतून काश्मिरी पंडित वीर सराफ यांना तिकीट दिले आहे, तर शगुन परिहार यांना किश्तवाडमधून उमेदवारी दिली आहे. या यादीतील त्या एकमेव महिला उमेदवार आहेत.
मुस्लिम उमेदवारांना संधी
जम्मूशिवाय काश्मीरमध्येही भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. काश्मीर खोऱ्यातील राजपोरा विधानसभा मतदारसंघातून अर्शीद भट्ट, अनंतनाग पश्चिममधून रफिक वानी आणि बनिहालमधून सलीम भट्ट यांना भाजपचे उमेदवार बनवण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांपैकी 70 जागांवर उमेदवार उभे करणार असून काश्मीरमधील 20 जागांवर अपक्षांना पाठिंबा देणार आहे.
तीन टप्प्यात निवडणुका
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोबरला लागणार आहे. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात २६ जागांवर आणि तिसऱ्या टप्प्यात ४० जागांवर मतदान होणार आहे.
हेही वाचा:


