चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर होताच अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “इच्छा असतांना…”

Chandrakant Khair – Ambadas Danve| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहेत. यात छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या जागासाठी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे देखील इच्छुक होते. मात्र चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर दानवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
दानवे म्हणाले की, “सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी करण्यात आली आहे. ही प्रभावी यादी आहे. दिल्लीत जाण्याची ही यादी आहे. मी 2014, 2019 मध्ये इच्छुक होतो तशी आताही इच्छा होती. इच्छा असणे चूक नाही. मात्र माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. पक्षप्रमुख जी काही जबाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.” मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.
पुढे दानवे म्हणाले की, “व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हित महत्वाचं आहे. मी पक्ष प्रमुखांना आता फोन करून बोललो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. चिंता नसावी जोमाने पक्षाचं काम करू असे त्यांना सांगितले आहे. इच्छा असतांना उमेदवारी मिळाली नसल्याने थोडफार वाईट वाटत असते. पण जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती मी पूर्ण करेल.”
हेही वाचा:
नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या विकास ठाकरेंची संपत्ती आहे कोटींच्या ‘घरात’





