दैनिक “प्रभात’ अन् दिशा परिवारामुळे युवकांची गगनभरारी व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन शिबिरात मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक दैनिक “प्रभात’ व दिशा परिवाराकडून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत नेवासे – गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या दै. “प्रभात’ आणि पुणे येथील दिशा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन शिबिरात अनेक मान्यवरांनी या उपक्रमाबाबत कौतुकांचा वर्षाव केला. या उपक्रमामुळे दैनिक “प्रभात’ आणि दिशा परिवाराने युवकांच्या पंखात बळ दिले असून, पुढील शिक्षणाची कवडसे खुली झाली आहेत. त्यामुळे आता युवक खूप शिकून ज्ञानामध्ये गगनभरारी घेईल, अशा शब्दांत मान्यवरांनी कौतुक केले. माऊली ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली गेली अशा नेवासे शहरातील मुळा एज्युकेशन संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात रविवारी (दि.15) दिशा परिवार व दैनिक “प्रभात’ यांच्यातर्फे व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आर्थिक मदत मिळाली. त्यांच्यासह नव्याने ज्या विद्यार्थ्यांना ही मदत दिली जाणार होती ते सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनी पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असलेले हे शिबिर दुपारी चार वाजेपर्यंत चालले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध विनोदी लेखक, कथाकथनकार संजय कळमकर, दिशा परिवाराचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे यश संवाद विभागाचे प्रमुख प्रा. देविदास साळुंखे, सुंदराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पानसरे, दैनिक प्रभातचे महाव्यवस्थापक बी. एल. स्वामी, व्यवस्थापक सी.ए रविकुमार इंडी, नगर आवृत्तीचे वृत्तसंपादक जयंत कुलकर्णी, तालुका प्रतिनिधी राजेंद्र वाघमारे, तसेच चिन्मय कुलकर्णी, अमित इंगळे, सुरज झांजे व आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. गेल्या सोळा वर्षांपासून दिशा परिवारातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात देऊन दोन हातांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी असंख्य मदतीचे हात पुढे करणारे दाते असून, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना थेट आर्थिक मदत पोहोच केली जाते. या दात्यांपैकी दैनिक “प्रभात’ एक आहे. “प्रभात’ने एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी 17 लाख रुपयांची मदत करीत 80 विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. त्यापैकी 45 विद्यार्थी नगर जिल्ह्यातील आहेत. कडाक्याची थंडी असूनही विद्यार्थ्यांसह पालक व मान्यवर सकाळी 9 वाजता महाविद्यालयात आले होते. दिशा परिवार व दैनिक “प्रभात’ने या वेळी विद्यार्थ्यांच्या नाश्त्यासह जेवणाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमामध्ये दिशा परिवाराच्या अनेक आजी-माजी विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले. यामध्ये प्रफुल्ल मोरे, चिन्मय कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, माधुरी चोपडे या विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सीए रविकुमार इंडी यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन व सूत्रसंचालन दिशा परिवाराचे माजी विद्यार्थी सुजित शिंदे यांनी केले.