मुंबई : राज्यातील शिवसेनेच्या विभाजनानंतर पहिलीच निवडणूक असल्याने बृह्न्मुंबई महापालिकेच्या निवडणूकीकडे सर्वाचे लक्ष आहे. निवडणूक आयोग निवडणुकीसंदर्भातील एक-एक प्रक्रिया पूर्ण करत आहेत. याचाच एक भाग म्हणून 20 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. आता याच यादीमध्ये तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उद्धवसेना, मनसे व विरोधी पक्ष अजूनच आक्रमक होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक दुबार मतदार हे एस वार्डमध्ये असून त्यांची आकडेवारी 69 हजार 500 एवढी आहे. बी वार्डमध्ये 8,398 एवढी दुबार नोंदणी अढळून आली आहे, जी सर्वात कमी आहे. दरम्यान, उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवरुन या प्रकरणावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, राजकिय पक्षांनी, माध्यमांनी व नागरिकांनी मतदार यादीतील घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यामुळे सूचना व आक्षेप घेण्याचा कालावधी 7 वरुन 21 दिवसांपर्यंत वाढवावा व आमचे आक्षेप बल्कमध्ये स्विकारावेत, अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे. निवडणूक आयोग म्हणजे सर्कस मतदारांची नावे लाखोंमध्ये दुबार-तिबार नोंदवली गेली आहेत, खोट्या घरांची नोंद आहे. एपिक क्रमांक, फोटो, नाव, पत्ता नसलेल्या ओळखपत्रांची संख्या देखील मोठी आहे. निवडणूक आयोगाने सूचना व आक्षेप नोंदवण्याचे दिवस वाढवले नाहीत व आमचे आक्षेप तपासून स्वीकारले नाहीत, तर हे स्पष्ट होईल की भाजप आणि निवडणूक आयोग दोघांनीही मिळून निवडणुकीचे फिक्सिंग केले आहे. निवडणूक आयोग आता एक सर्कस झाला आहे; भारतात पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका घेणारी तटस्थ संस्था राहिलेली नाही, असे म्हणताना आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोग व भाजपवर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडले.