मुंबई – ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आज (दि. २१) आर्थर रोड तुरुंगात दाखल झाला. आज जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली आहे.
करोनाच्या काळात कैद्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. आजपासून भेटीची परवानगी पुन्हा देण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी शाहरुख ऑर्थर रोड तुरुंगात आपल्या लेकाला भेटण्यासाठी पोहोचला आहे.
यावेळी शाहरुख एकटाच आपल्या मुलाला भेटण्यासाठी पोहोचला होता. या संभाषणादरम्यान, वडील आणि मुलगा यांच्यामध्ये काचेची भिंत होती. दोघेही इंटरकॉमद्वारे बोलले. ही भेट १६ ते १८ मिनिटे चालली. आणि त्यानंतर शाहरुख तेथून रवाना झाला.
शाहरुख तुरुंगातून आपल्या मुलाची भेट घेऊन निघाला त्यावेळी त्याची एक छबी टिपण्यासाठी ऑर्थर रोड परिसरात प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला. शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता.
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी यापूर्वी आर्यनशी व्हिडीओ कॉलवर बोलले होते. तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून दोनदा व्हिडीओ कॉलवर कुटुंबाशी संवाद साधण्याची परवानगी होती.
आर्यन खान याचा जामीन अर्ज एनडीपीएस कोर्टाने फेटाळला आहे. तसेच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले. या निर्णयाविरोधात आर्यन खानने एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आता या निर्णयावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.