गुजरातच्या जनतेलाही 1 मार्चपासून मोफत वीज देणार – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली – दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्ली सरकारच्या मोफत वीज योजनेच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगले संतप्त झाले आहेत. त्यांनी या आदेशावरून राज्यपालांसोबत भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
कजेरीवाल म्हणाले की, गुजरातच्या जनतेला आम आदमी पक्षाची मोफत विजेची हमी खूप आवडली आहे. त्यामुळे भाजपचे सरकार दिल्लीतील मोफत वीज योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दिल्लीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. मी त्यांना मोफत वीज देणे सुरूच ठेवणार आहे. तसेच गुजरातच्या जनतेलाही मी येत्या 1 मार्चपासून मोफत वीज देणार आहे.
केंद्र सरकारला लक्ष्य करताना ते म्हणाले की, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावला आहे. इतकी महागाई केली आहे. तुम्ही लोकांचे रक्त शोषत आहात. अशात जर मी माझ्या लोकांना वीज मोफत देऊन थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला तेही सहन होत नाही. तुम्हाला तेही थांबवायचे आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मी हे होऊ देणार नाही.
दरम्यान, दिल्लीतील वीज वितरण कंपन्यांची जी देणी आहेत त्यात गैरप्रकार झाल्याचा दावा करत दिल्लीच्या नायब राज्यपालांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात दिल्लीच्या मुख्य सचिवांनी सात दिवसांत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते जास्मीन शहा आणि याच पक्षाचे खासदार एन. डी. गुप्ता यांचे पुत्र नवीन गुप्ता यांना एका कंपनीत संचालक बनवण्यात आले असून त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे राज्यपालांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.




