नवी दिल्ली – आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले. त्यामधून श्रीमंतांना कर्जमाफी न देण्याची मागणी करण्यात आली. अब्जाधीशांना दिली जाणारी कर्जं माफ करण्याला प्रतिबंध घालणारा कायदा केंद्र सरकारने आणावा, अशी अपेक्षा त्या पत्रातून व्यक्त करण्यात आली. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत मोदींना पत्र पाठवल्याची माहिती दिली. एकीकडे सामान्य जनतेच्या वेतनातील निम्मी रक्कम कर भरण्यात संपते. तर, दुसरीकडे श्रीमंतांची कर्जं माफ केली जातात. केंद्र सरकार सामान्य जनतेचे गृह कर्ज, वाहन कर्ज माफ का करत नाही? श्रीमंतांची कर्जमाफी थांबल्यास प्राप्तिकर, जीएसटीचे दर निम्मे करता येऊ शकतील. तसेच, अत्यावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करता येऊ शकेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.