नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिलासा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांना जामीन मंजूर करण्याच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. त्याविरोधात केजरीवाल यांनी दाद मागितली आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी केजरीवाल सध्या तुरूंगात आहेत. त्यांना 20 जूनला विशेष न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. मात्र, ईडीने त्या आदेशाला आव्हान दिले. त्यानंतर पुढच्याच दिवशी उच्च न्यायालयाने संबंधित आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. तसेच, आपला निर्णय देण्यासाठी 2 ते 3 दिवस लागणार असल्याचे सूचित केले. तो निर्णय येण्याआधी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. केजरीवाल यांना ईडीने 21 मार्चला अटक केली. त्यानंतर त्यांची रवानगी दिल्लीतील तिहार तुरूंगात झाली. लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 10 मे यादिवशी अंतरिम जामीन मंजूर केला. त्या न्यायालयाच्या आदेशानुसार 2 जूनला शरण येत केजरीवाल तुरूंगात परतले. विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ते पुन्हा तुरूंगाबाहेर येण्याची शक्यता बळावली. मात्र, उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीमुळे त्यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला.