पद्मश्री अरूणिमा सिन्हा यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आरोप

लखनौ : पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली अपंग महिला अरूणिमा सिन्हा हिच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान अरूणिमा आणि त्यांच्या पतीवर कारवाईच्या मागणीसाठी तिची बहीण आणि दाजी यांनी त्यांच्या तान्हुल्यासह आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. लखनौ येथील विधानसभा इमारतीसमोरच त्यांनी हा प्रयत्न केला.
बंदोबस्तावरील पोलिसांनी हा प्रयत्न अयशस्वी केला. अरूणिमा यांचे दाजी ओमप्रकाश यात 30 टक्के भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. ओमप्रकाश यांच्या म्हणण्यानुसार, आपण अरूणिमा आणि त्यांच्या पतीसोबत काही वर्षापुर्वी स्थापन केलेली एक कंपनी त्यांनी बळकावली आहे. त्यात माझा 50 टक्के वाटा आहे.
अरूणिमा यांची बहीण लक्ष्मी यांनी सांगितले की, त्यांना (अरुणिमा आणि त्यांचे पती) आता मला ठार करायचे आहे. त्यांनी माझ्या पतीवर दोनदा हल्ला केला आहे. याबाबत आम्ही पोलिसांत फिर्याद नोंदवली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. जर तपासात हलगर्जीपणा केल्याचे आढळले तर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अरूणिमा या प्रख्यात गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट, किलीमांजारो (टांझानिया), कोस्कीउस्को (ऑस्ट्रेलिया) अकॉनकागुआ (द. अमेरिका) आदी उत्तूंग शिखरे सर्वप्रथम सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अपंग गिर्यारोहक आहेत. 2011 मध्ये चोरट्यांनी त्यांना रेल्वेतून फेकून दिल्याने त्यांनी आपले पाय गमावले होते.

