मुंबई : मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील एकेकाळचे कुख्यात गँगस्टर अरुण गवळी बुधवारी 18 वर्षांच्या तुरुंगवासानंतर नागपूर सेंट्रल जेलमधून सुटका होऊन दगडी चाळीतील आपल्या घरी परतला. 2007 च्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 76 वर्षीय गवळीला जामीन मंजूर केला. यापूर्वीही गवळी पॅरोलवर अधूनमधून बाहेर येत होता, परंतु यावेळची त्याची सुटका आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेत आहे. गुन्हेगारी विश्वातील दबदबा एकेकाळी अरुण गवळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील मोठे नाव होते. त्याने दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अमर नाईक यांसारख्या कुख्यात टोळ्यांना टक्कर दिली. गवळी, दाऊद आणि छोटा राजन यांना आजही अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखले जाते. जरी आज मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांची ताकद कमी झाली असली, तरी भायखळा आणि दक्षिण मुंबईत गवळीच्या नावाचा दरारा कायम आहे. राजकीय प्रभाव गवळीच्या तुरुंगातून बाहेर येण्याच्या वेळेकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. कारण येत्या काही महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. भायखळा हा गवळीचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गवळी तुरुंगात असतानाही त्याची मुलगी गीता गवळीने या भागातून सातत्याने महापालिका निवडणुका जिंकल्या आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, भायखळ्यातील सुमारे 3.50 लाख मतदारांवर गवळीचा प्रभाव पडू शकतो. राजकीय पार्श्वभूमी आणि शिवसेना अरुण गवळी 2004 मध्ये चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आला होता. तसेच, त्याने लोकसभा निवडणुकीत 92 हजार मते मिळवली होती. कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात तुरुंगात गेल्यानंतर गवळीचा थेट राजकारणाशी संबंध कमी झाला, परंतु त्याच्या अखिल भारतीय सेनेने महापालिकेत नेहमीच शिवसेनेला पाठिंबा दिला. आगामी निवडणुकीत गवळीची भूमिका काय? शिवसेनेतील फूट आणि उद्धव ठाकरे गट व भाजप यांच्यातील स्पर्धेमुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत गवळीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, तर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही दक्षिण मुंबईतील मतदारांचा पाठिंबा हवा आहे. गवळीचा प्रभाव आजही या भागात कायम असल्याने, तो महायुतीला साथ देणार की महाविकास आघाडीला, यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. गवळीच्या सुटकेने भायखळ्यातील राजकीय वातावरणात नवे रंग भरण्याची शक्यता आहे.