Satara | कलावंतांनी केला लढवय्या कर्करुग्णांच्या संघर्षाला सलाम

सातारा, (प्रतिनिधी) – दरवर्षी २२ सप्टेंबर हा दिवस जागतिक रोज दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. तो साजरा करण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी खंबीरपणे लढा देणाऱ्या रुग्णांना आधार देणे व त्यांच्या यशस्वी लढ्याचा गौरव करणे.
यानिमित्ताने साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, लायन्स क्लब अजिंक्य यांच्या संयुक्त विद्यमाने रोज डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्सरग्रस्त रुग्णांचे दु:ख कमी करण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील शिवानी नाईक (अप्पी) आणि मकरंद गोसावी (स्वप्निल) हे कलावंत उपस्थित होते.
या कलावंताच्या हस्ते सेंटरमधील कर्करुग्णांना गुलाबाचे फुल आणि फळे देत, कर्करोगाविरुध्दच्या त्यांच्या लढाईचे कौतुक करण्यात आले.
यावेळी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख, वरिष्ठ सल्लागार डॉ. अर्जून शिंदे, मॅनेजिंग डायरेकटर सचिन देशमुख, डायरेकटर रिसॉर्स डॉ. प्रताप राजेंमहाडिक, लायन्स क्लब अजिंक्यचे प्रेसिडेंट अरविदजी शेवाळे, लायन्स क्लब अजिंक्यचे संस्थापक बी एस जाधव वा लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी, प्रख्यात इतिहासकार निलेश झोरे,
चित्रपट महामंडळ अध्यक्ष महेश देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
कॅनडातील १२ वर्षांची मेलिंडा रोज हिला खूप लवकर ब्लड कॅन्सर झाला. तिने आपल्या सहा महिन्यांच्या काळात तिने ब्लड कॅन्सरशी निकराची झुंज दिली.
मेलिंडाने धैर्याने कॅन्सरशी दिलेल्या लढ्यासोबतच इतर रुग्णांना दिलेल्या प्रेरणेच्या गौरवाप्रीत्यर्थ तिच्या मृत्युनंतर जागतिक रोज डे साजरा केला जातो.
या निमित्त साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे कॅन्सरशी यशस्वी लढा दिलेल्या व्यक्तींच्या मदतीने जनजागृती करण्यात आल्याची प्रतिक्रिया ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख यांनी व्यक्त केली.





