Neelam Gorhe : उबाठाकडून टीकचे बाण… शिंदे गटातही नाराजीचा सूर… नीलम गोऱ्हेंना ‘ते’ विधान चांगलंच महागात पडलं!

नवी दिल्ली: दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्या की ते एक पद देतात, असे विधान करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्या विधानाच्या निषेध करत आक्षेप घेण्यात आला. आता त्यांच्या या विधानावर शिवसेना शिंदे पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गोऱ्हे यांच्यावर एकीकडे जहरी टीका आणि अब्रुनुकसानीचा दावा, अशा दुहेरी कात्रीत त्या सापडल्या आहेत. यामुळे या विधानावर त्या आपली भूमिका स्पष्ट करणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची गरज नव्हती, असे पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. गरज नसताना आणि अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला डॅमेज झाल्याची भावना या नेत्यांनी व्यक्त केली आहे. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः त्यावर समोर येऊन बोलावे, अशी भूमिका शिंदे गटातील नेत्यांनी घेतली असल्याची माहिती आहे. यामुळे गोऱ्हे या त्यांची बाजू माध्यमांसमोर मांडणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. मात्र, सध्या तरी त्यांनी केलेल्या व्यक्त्यामुळे त्या चांगल्याच कोंडीत सापडल्या आहेत.
तसेच संमेलनाचे सागताध्यक्ष शरद पवार यांनी देखील दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. संजय शिरसाट आणि प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा अपवाद वगळता शिंदे गटातून नीलम गोऱ्हे यांच्या बचावासाठी फार कोणी पुढे आलेले दिसत नाही.
नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असे विधान केले होते. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो. कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर ठाकरे गटातील नेते त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करत आहेत.





