Pune District : परतीच्या पावसाची हजेरी
Pune District : गेल्या अनेक दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला.

तळेगाव ढमढेरे : यंदा पावसाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची निराशा केली. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, बोअरवेल, नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा परिस्थितीत शुक्रवार (दि.30) सायंकाळी 6 च्या दरम्यान परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला. पावसाअभावी कोमेजलेल्या पिकांना पावसाचा फायदा होण्याची आशा निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पेरणीसाठीही जमिनीतील ओलावा उपयोगी ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी पिके पाण्याअभावी जळून गेली. जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे परतीच्या पावसाची प्रत्येक सर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे.
मात्र, परतीचा पाऊस पुरेसा आणि सातत्याने पडणे गरजेचे आहे. केवळ तुरळक सरींनी दुष्काळाचे संकट दूर होणार नाही. त्यामुळे आगामी काळात पावसाचे प्रमाण वाढावे, जमिनीतील पाणीपातळी सुधारावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. संकटाच्या काळात बरसलेल्या पावसाने बळीराजाच्या मनात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण केला आहे.





