रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
Updated On:

दि हेग –आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. युक्रेनशी संबंधित युद्ध गुन्ह्यांबद्दल ते पाऊल उचलण्यात आले. मागील वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. त्यानंतर वर्ष उलटले तरी दोन्ही देशांमधील युद्धाला पूर्णविराम मिळालेला नाही. युक्रेनवरील आक्रमणावरून पुतिन अनेक देशांच्या टीकेचे धनी बनले आहेत.
आता ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्याही रडारवर आले आहेत. पुतिन यांच्यावर प्रामुख्याने युक्रेनमधील बालकांच्या अपहरणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचे प्रतिकूल परिणाम अनेक देशांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे रशियन आक्रमणाच्या विरोधात जागतिक स्तरावरून निषेधाचा तीव्र सूर उमटत आहे. आता पुतिन यांच्या विरोधातील वॉरंटमुळे रशियाची आणखी नाचक्की होणार आहे.





