पुणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2013 मधील एका प्रकरणात मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना अटक होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘या’ प्रकरणी जारी करण्यात आले अटक वॉरंट नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणात मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे यांना दोनदा समन्स बजावले होते. त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते. मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने जरांगे यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.