बारामती – शहरातील डॉक्टरवरील हल्ला प्रकरणातील आरोपींना 48 तासांत जेरबंद करा; अन्यथा खासगी कोविड केअर सेंटर सेंटर बंद करू, असा इशारा बारामती शहरातील डॉक्टरांनी दिला आहे. शहरातील डॉ. सुजित अडसूळ यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात यावी, यासाठी शनिवार (दि.12) शहरातील सर्व डॉक्टर एकत्र आले होते.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना कारवाईबाबतचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी डॉ. संजय पुरंदरे, डॉ. विभावरी सोळुंके, डॉ. सुजित अडसूळ, डॉ. राहुल जाधव आदींनी संताप व्यक्त केल्या. करोनाच्या काळात डॉक्टर चोवीस तास काम करीत आहेत, अशा काळात त्यांचे मनोधैर्य वाढविण्याऐवजी हल्ला होतो, ही बाब निंदनीय आहे. प्रशासनाने डॉक्टरांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, गटनेते सचिन सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खामणे, डॉ. सदानंद काळे, अमर पवार, सुजित अडसूळ, संतोष घालमे, अविनाश आटोळे, राजेंद्र चोपडे, तुषार गदादे, आशिष जळक, प्रशांत मांडण, पांडुरंग गावडे, राजेश कोकरे, चंद्रशेखर धुमाळ, जितेंद्र आटोळे, सचिन घोरपडे, सचिन घोळवे, सूरज भगत, हर्षल राठी, प्रदीप व्होरा, डी. एन. धवडे, विशाल मेहता, प्रशांत माने, चंद्रशेखर पिल्ले, दिनेश ओसवाल, आनंद हारके, प्रितम ललगुणकर, वृषाली हारके, भास्कर जेधे उपस्थित होते.
पोलीस प्रशासन डॉक्टरांच्या पाठीशी
बारामतीतील डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ जेरबंद केले जाईल. आरोपींचा हा दुसरा गुन्हा असून त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव देखील पाठवला जाईल अशी ग्वाही यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. पोलीस प्रशासनाने सर्व कोविड केअर सेंटरला सुरक्षा पुरविण्याची ग्वाही दिली असल्याचे ते यावेळी म्हणाले.