पाकमध्ये घुसलेल्या अफगाणी निर्वासितांची धरपकड; पुन्हा अफगाणिस्तानमध्ये पाठवणार

इस्लामाबाद – पाक सरकारने पुर्वीच इशारा दिल्याप्रमाणे बेकायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये वास्तव्य करणाऱ्या अफगाणी शरणार्थ्यांची धरपकड करायला आजपासून सुरुवात केली. या शरणार्थ्यांपैकी डझनभर शरणार्थ्यांना अफगाण सीमेवरून अफगाणिस्तानमध्ये घालवून दिले गेले आहे. अफगाणी शरणार्थ्यांनी पाकिस्तान सोडून आपल्या मूळ देशात निघून जाण्यासाठी पाक सरकारने ठरवून दिलेली मुदत काल संपली आहे. त्यामुळे या कारवाईला देशभरात सुरुवात करण्यात आली आहे.
ज्या शरणार्थ्यांकडे वैध कागदपत्रे नाहीत, त्यांना शोधून पाकिस्तानबाहेर घालवून दिले जाणार आहे. देशभरातील जवळपास 20 लाख बेकायदेशीर शरणार्थ्यांना यामुळे पाकिस्तानबाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील हंगामी सरकारच्या या भूमिकेवर संयुक्त राष्ट्राने आणि अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाने देखील कठोर टीका केली आहे.
देशभरात बेकायदेशीर शरणार्थ्यांविरोधातील कारवाई सुरू करण्यात आल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेले पाकिस्तानचे कराची बंदर, रावळपिंडी आणि दक्षिणेकडील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुन्वा प्रांतांमधील काही निवडक ठिकाणांमधून देखील अफगाणी शरणार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगळवारी हजारो अफगाणी शरणार्थ्यांनी आज अटक केली जाऊ नये म्हणून ट्रक आणि बसच्या माध्यमातून दोन मुख्य सीमांच्या दिशेने प्रस्थान केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये सुमारे 20 लाख अफगाणी शरणार्थी आहेत. त्यातील 6 लाख शरणार्थ्यांनी 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यापासून पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.
आम्ही 64 अफगाणी नागरिकांना आज “गुड बाय’ म्हटले आहे. या अफगाण शरणार्थ्यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला आहे. ही कारवाई योग्य कागदपत्रांशिवाय देशात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला परत पाठवण्याच्या पाकिस्तानच्या निर्धाराचा पुरावा आहे. – सर्फराज बुग्ती (पाकिस्तानमधील हंगामी गृह मंत्री)





