आयबी अधिकाऱ्याच्या हत्येचे प्रकरण
नवी दिल्ली : येथील न्यायालयाने गुरूवारी आपमधून निलंबित करण्यात आलेला नगरसेवक ताहीर हुसेन याची शरण येण्यासंबंधीची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.
ईशान्य दिल्लीत नुकत्याच झालेल्या हिंसाचारावेळी गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली. त्या हत्येमागे हुसेन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
त्या आरोपावरून हुसेन याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे आपने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पक्षातून निलंबित केले. गुन्हा दाखल झाल्यापासून हुसेन फरार होता.
मात्र, त्याने न्यायालयापुढे शरण येण्यासाठी याचिका दाखल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सुनावणीवेळी पोलीस हजर राहिले. न्यायालयाने याचिका फेटाळताच पोलिसांनी हुसेन याला अटक केली.
शर्मा यांच्या कुटूंबीयांनी त्यांच्या हत्येमागे हुसेन असल्याचा आरोप केला होता. शर्मा कुटूंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्याच आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, हुसेन याने याआधीच हत्येत सामील असल्याचा आरोप फेटाळला आहे.