छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेला (Jal Jeevan Mission) महाराष्ट्रात मोठा आर्थिक अडथळा निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने या योजनेच्या गंभीर समस्यांना अधोरेखित केले आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण केली होती, परंतु शासनाकडून 1.40 कोटी रुपयांचे थकित बिल आणि 65 लाखांचे कर्ज यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर जलजीवन मिशनच्या 35,622 कोटी रुपयांच्या थकबाकीचा मुद्दा समोर आला आहे, ज्यामुळे कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे. जलजीवन मिशनच्या कामांसाठी 35,622 कोटी रुपये थकले आहेत. केंद्र सरकारकडून 19,259 कोटी रुपये, तर राज्य सरकारकडून 16,363 कोटी रुपये ठाकले आहेत. 2024-25 मध्ये केंद्राने जलजीवन मिशनसाठी 5,352.93 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले होते, परंतु केवळ 1,605.879 कोटी रुपये मिळाले. ऑक्टोबर 2024 पासून केंद्राकडून एकही रुपया प्राप्त झालेला नाही. तसेच राज्याने 2024-25 साठी 4,052.50 कोटी रुपये मंजूर केले, त्यापैकी 1,568.4086 कोटी रुपये वितरित झाले. परंतु, लाडकी बहीण योजनेसारख्या इतर योजनांमुळे जलजीवन मिशनसाठी निधी वर्ग करण्यात अडथळे येत आहेत. हर्षल पाटील आत्महत्या प्रकरण काय? सांगलीतील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण केली होती. मात्र, 1.40 कोटी रुपयांचे थकित बिल आणि त्यासाठी घेतलेल्या 65 लाखांच्या कर्जामुळे त्यांच्यावर प्रचंड आर्थिक आणि मानसिक दबाव होता. सरकारकडून वेळेत पैसे न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. या घटनेने कंत्राटदारांमधील असंतोष आणि योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.