संयुक्तराष्ट्र – गेल्या वर्षी जगातल्या 53 देशांतील सुमारे 11 कोटी 30 लाख लोकांपुढे भूकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. संघर्ष, वातावरणातील बदलातून आलेली आपत्ती, आर्थिक आरीष्ट्य अशा कारणांमुळे हा भूकेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे संयुक्तराष्ट्रांच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. युरोपिन युनियन आणि संयुक्तराष्ट यांच्या संयुक्तवतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
अन्न आणि कृषी संस्था (एफएओ), वर्ल्ड फूड प्रोग्रॅम (डब्युएफपी), यांचीही मदत या अहवालासाठी घेण्यात आली आहे. गेले लागोंपाठ तीन वर्षे किमान दहा कोटी किंवा त्यापेक्षा आधिक लोकांपुढे भूकेचा प्रश्न निर्माण होत आला आहे असे यात नमूद करण्यात आले आहे. सन 2018 हे वर्ष त्यादृष्टीने सर्वात गंभीर वर्ष होते. या वर्षात सर्वाधिक नागरीकांना भूकेच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. या वर्षात येमेन, कांगो, अफगाणिस्तान, इथोपिया, सिरिया, सुदान, आणि उत्तर नायजेरिया या देशांतील नागरीकांपुढे भुकेची समस्या सर्वाधिक चिंताजनक होती.
नैसर्गिक समस्येमुळे अन्नाची कमतरता ही समस्याही दिवसेंदिवस उग्र होत चालली असून त्याचा कसा मुकाबला करायचा याचीही विचार जागतिक पातळीवरील नेत्यांना करावा लागणार आहे. कमी किंवा अपुऱ्या अन्नामुळे आरोग्याचेही भीषण प्रश्न या देशांमध्ये भेडसाऊ लागले आहेत. विषेशत: बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण तर अत्यंत वेदनादायी असून अशा बालकांना त्यातून कायम स्वरूपी काही गंभीर आजार उद्भवण्याचीही शक्यता वाढत आहे.,