सैन्यदल भरती पेपरफुटी : लष्कराच्या दोन कर्मचाऱ्यांसह माजी सैनिकाचाही सहभाग; 7 जण अटकेत

पुणे – सैन्य दलातील शिपाई भरतीची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या सात जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये लष्करातील दोघांचा समावेश आहे. हे आरोपी 28 फेब्रुवारी रोजी पुण्यात होणाऱ्या परीक्षेतील उमेदवारांना ही प्रश्नपत्रिका विकणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.
याप्रकरणी वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वानवडी येथील गुन्ह्यात किशोर गिरी (40, रा. बारामती) माधव गीते (38, पुणे), गोपाळ कोळी (31, दिघी) आणि आणि उदय आवटी (वय 23, खडकी) या चौघांना अटक केली आहे.
यातील गोपाळ कोळी ट्रेनिंग बटालियन-2 मध्ये कवायत प्रशिक्षक, उदय आवटी हा खडकी येथे रेजिमेंटल पोलीस म्हणून सैन्य दल कर्मचारी आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अली अख्तरखान (वय 47, रा.बोपखेल), आझाद लालमोहम्मद खान (वय 37, रा. उत्तरप्रदेश) आणि महिंद्र सोनवणे (वय 37, संगमनेर) या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “28 फेब्रुवारी रोजी देशभरात 40 परीक्षा केंद्रावर रिलेशन आर्मीची शिपाई भरती परीक्षा होणार होती. याला 30 हजार उमेदवार बसले आहेत. दरम्यान, ही प्रश्नपत्रिका फोडून काही व्यक्ती ती सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरपूर किंमतीने विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. त्यांनी ही माहिती पुणे पोलिसांना दिली.
पोलिसांच्या पथकांनी वानवडी आणि विश्रांतवाडी हद्दीत सापळा रचला. युनिट- 4 चे सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे आणि पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाच्या मदतीने कारवाई केली. यातील आरोपी माधव गीते याने फोडलेली प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षार्थींना देण्यासाठी 14 जणांना विश्रांतवाडीत एकत्र केले होते. गीते हा माजी सैनिक असून, तो महिनाभरापूर्वीच सेवानिवृत्त झाल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी दिली.
आर्मी रिलेशन भरती परीक्षा 28 फेब्रुवारी रोजी होणार होती. परीक्षेचा पेपर फोडणारी टोळी पुण्यात सक्रिय असल्याची माहिती आम्हांला मिळाली. आरोपी महेंद्र सोनवणे हा प्रत्येक परीक्षार्थीकडून एक लाख रुपये घेऊन पेपर आणून देणार सांगत होता. याबाबत एका उमेदवाराने पोलिसांकडे तक्रार केली. या गुन्ह्याची मोठी व्याप्ती पाहता तपासकरिता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करणार आहे.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे
पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. फुटलेला पेपर पडताळणी केला असता, तो मूळ पेपरसारखा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देशभरात नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
– डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त, पुणे





