करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लष्करही तयार
* ८ हजार वैद्यकीय कर्मचारी * करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ९ हजार बेड सज्ज

नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार त्या त्या पातळीवर आपले काम करत आहे. याचदरम्यान करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ९ हजारांपेक्षा अधिक बेड सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत दिली आहे. त्यांनी ही माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना दिली.
करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ८ हजार ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी तयार असल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. गरज भासल्यास सामान्य नागरिकांना या सेवा उपलब्ध करण्यात येतील. तसेच नेपाळलाही करोनाचा सामना करण्यासाठी लवकरच मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या पाच दिवसांमध्ये देशात निरनिराळ्या ठिकाणी तब्बल २५ टन वैद्यकीय साधन सामग्री पोहोवली असल्याची माहिती हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना दिली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हवाईदलाची आवश्यक ती कामे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लष्कराचे एक डॉक्टर करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत संरक्षण मंत्र्यांशी ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.





