पुणे – भविष्यातील संभाव्य दहशतवादविरोधी कारवाईसाठी तत्काळ कृतीदले कार्यान्वित करताना सैन्यदल आणि पोलीस यांच्यात समन्वय असावा, या उद्देशाने पुण्यात पोलीस आणि लष्कराने संयुक्त सराव केला. लष्कराच्या अग्निबाण विभागाच्या वतीने लुल्लानगर येथे हा सराव करण्यात आला.
यात तत्काळ कृतीदले, डॉग स्क्वॉड्स आणि सैन्यदलाचे बॉम्ब निकामी करणारे पथक तसेच दहशतवादविरोधी पथक आणि महाराष्ट्र पोलिसांचे तत्काळ कृतीपथक सहभागी झाले होते. एका निवासस्थानी दहशतवादी असल्याची परिस्थितीवर सिम्युलेटेड सराव आखलेला होता. त्यानुसार सैन्यदलाच्या तत्काळ कृती दलाने सर्वात बाहेरील वेढा रचला.
आसपासच्या वाहतुकीची व्यवस्था महाराष्ट्र वाहतूक पोलीस व लष्करी पोलीस दलाने संयुक्तपणे हाताळली. त्यानंतरची दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्याची कारवाई ही लष्कराच्या दहशतवादविरोधी पथकाने व महाराष्ट्र पोलिसांच्या तत्काळ कृतीदलाने मिळून केली.
यामध्ये जागेत प्रवेश करणे, डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने स्फोटकांचा शोध घेणे आणि बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाद्वारे ती स्फोटके निकामी करणे, याबाबींचा समावेश होता. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू प्रदर्शित केल्या होत्या.