किश्तवाडमधील चकमकीत लष्करी अधिकाऱ्याला वीरमरण; 3 जवान जखमी

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी जोरदार धुमश्चक्री झाली. त्या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आले. तर, 3 जवान जखमी झाले. किश्तवाडमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या 2 रक्षकांचे अपहरण केले. त्या दोघांचीही हत्या करण्यात आली.
त्यानंतर लष्करी जवान आणि पोलिसांनी नजीकच्या जंगलांमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवान आणि दहशतवादी आमनेसामने आले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. त्या चकमकीत लष्कराचे अधिकारी आणि जवान मिळून चौघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले.
दुर्दैवाने, राकेश कुमार या अधिकाऱ्याची प्राणज्योत मालवली. ते नायब सुभेदार या पदावर कार्यरत होते. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी 2 जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. चकमकस्थळी सुरक्षा जवानांनी 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरले आहे. ग्राम सुरक्षा दलाच्या रक्षकांच्या हत्येत तेच दहशतवादी सामील असल्याचा अंदाज आहे. संबंधित ठिकाणी सुरक्षा दलांची मोहीम रात्री उशीरा अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत सुरू होती.





