नवी दिल्ली – तुलनेने कमी असणारी किंमत, अनेक कारणांसाठी वापरण्याची क्षमता आणि मोठी संख्या यामुळे येत्या काही वर्षात ड्रोन हा मोठा धोका असेल, असे लष्कर उपप्रमुख ले. जन. एस. के सैनी यांनी सांगितले. सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज यांनी घेतलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
नजिकच्या भविष्यात ड्रोन सारखी धोक्याची तिसरी बाजू पुढे येऊ शकते. लष्कराने त्याला तोंड देण्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी. त्यामुळे ड्रोन नष्ट करणारी आणि त्याचा धोका कमी करणारी अशी स्वार्म टेक्नॉलॉजी ही सध्याच्या काळाची गरज आहे, असे सैनी यांनी नमूद केले.
भारतीय लष्कर मोठ्या संख्येने उणे 50 अंश तापमानात आपले जवान तैनात करते. मात्र त्यांच्यासाठी देशात तयार होत नसल्याने परदेशातून गरम कपडे आयात करावे लागतात. आत्मनिर्भर योजनेच्या यशासाठी याही क्षेत्रात काम होण्याची गरज आहे, असेही सैनी म्हणाले.
आधुनिक शस्त्रे, दारूगोळा, संरक्षण आणि कपड्यांमध्ये लष्कर गुंतले आहे. मात्र त्यात अधिक संशोधनाला आणखी खूप वाव आहे. रात्री दिसणारे गॉगल्स, युद्धातील हेल्मेट, बुलेटप्रुफ जाकीट, हलक्या वजनाची दळवळण यंत्रणा यावर लक्ष देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
दूरनियंत्रकांद्वारे घडवले जाणारे बॉम्बस्फोट हे दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही शक्तींचे खेळणे बनले आहे. प्रत्यक्ष संपर्कात न येता हे स्फोट घडवता येत असल्याने त्याचा धोका अधिक व्यापक आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक हानी पोहचवता येऊ शकते. संरक्षण दलांना त्यांच्या संरक्षणासाठीही तजवीज करावी लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.