जयपूर: “दहशतवाद्यांच्या विरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. जोपर्यंत दहशतवादी विचार पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत शांततेसाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील,” असा ठाम निर्धार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी व्यक्त केला. जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर लष्करी दिनानिमित्त (Army Day 2026) आयोजित ‘शौर्य संध्या’ कार्यक्रमात ते बोलत होते. साहस आणि संयमाचा संगम ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय जवानांनी अत्यंत कठीण परिस्थितीत, दबाव असतानाही ज्या संयमाने आणि धैर्याने ही कारवाई केली, ती अभूतपूर्व आहे. दहशतवाद्यांविरुद्धची ही कारवाई पूर्णपणे विचारपूर्वक आणि मानवी मूल्यांचे जतन करून करण्यात आली. त्यामुळे हे ऑपरेशन साहस आणि संतुलनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाईल. २०४७ पर्यंत जागतिक महाशक्तीचे ध्येय भारतीय सैन्य आज जगासाठी ‘शांती दूत’ म्हणून उदयास येत असल्याचे सांगून संरक्षण मंत्र्यांनी सैन्यातील महिला आणि तरुणांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले. वर्ष २०४७ पर्यंत भारतीय लष्कराला जगातील सर्वात सशक्त सैन्य दलाच्या रूपात उभे करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. स्वदेशी युद्धसामग्रीने उंचावली मान यावेळी थलसेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी परेडची पाहणी करून सलामी स्वीकारली. दक्षिण-पश्चिम कमांडचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टिनेंट जनरल हरविंदर सिंह यांनी संचलनाचे नेतृत्व केले. ‘भारतीय सैन्य-शौर्य आणि बलिदान’ या संकल्पनेवर (थीम) आधारित या परेडमध्ये भारतीय लष्कराच्या अजेय शक्तीचे दर्शन घडले. या आधुनिक शस्त्रास्त्रांचे झाले प्रदर्शन: क्षेपणास्त्र व रणगाडे: स्वदेशी ब्रह्मोस क्षेपणास्त्र, भीष्म आणि अर्जुन रणगाडे, के-९ वज्र तोफ, नाग मिसाइल सिस्टम (नामिस), पिनाका रॉकेट लॉन्चर. अत्याधुनिक तंत्रज्ञान: ड्रोन शक्ती, ड्रोन जॅमर, इलेक्ट्रिक ऑल-टेरेन व्हीकल आणि रोबोटिक म्यूल. विशेष आकर्षण: नव्याने स्थापन झालेली ‘भैरव बटालियन’ आणि लष्कराच्या सात रेजिमेंटच्या तुकड्यांनी दिमाखदार मार्च पास्ट केला. स्त्रीशक्ती आणि आंतरराष्ट्रीय मैत्री लष्करातील महिलांच्या वाढत्या भूमिकेचे दर्शन घडवण्यासाठी एनसीसीच्या मुलींच्या तुकडीने संचलनात सहभाग घेतला. तसेच, नेपाळ आर्मी बँडच्या सहभागाने भारत आणि नेपाळमधील लष्करी मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले. शूरवीरांना मरणोत्तर सन्मान – ऑपरेशन ‘सिंदूर’ आणि इतर मोहिमांमध्ये असीम शौर्य गाजवणाऱ्या शूरवीरांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये सूभेदार मेजर पवन कुमार, हवलदार सुनील कुमार सिंह, लांस नायक दिनेश कुमार, लांस नायक सुभाष कुमार आणि लांस नायक प्रदीप कुमार यांना मरणोत्तर ‘सेना पदक (गॅलंट्री)’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.