लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना

नवी दिल्ली – लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे 8 ते 12 एप्रिल दरम्यानच्या बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. बांग्लादेश मुक्ती संग्रामाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वर्णिम विजय वर्ष समारंभाच्या पार्श्वभूमीवर जनरल नरवणे यांचा हा दौरा आहे. बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे ऐतिहासिक नेतृत्व आणि भारतीय सशस्त्र सैन्यासह खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या मुक्ति बाहिनीच्या शौर्यामुळे बांगलादेश मुक्त झाला.

लष्करप्रमुख शिखा अनिर्बन येथे पुष्पहार अर्पण करून मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर बांगलादेशच्या सशस्त्र दलाच्या तीन सेवा प्रमुखांशी स्वतंत्र बैठक होईल. जनरल नरवणे हे धानमंडी येथील राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान स्मृती संग्रहालयालाही भेट देतील, तेथे ते बांगलादेशच्या संस्थापकांना श्रद्धांजली वाहतील.

लष्करप्रमुख 11 एप्रिल 2021 रोजी ढाका येथील बांगलादेश सैन्याच्या बहुउद्देशीय संकुलात बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधतील आणि तेथे ते संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सहकार्य मोहिमेवरील चर्चासत्रात भाग घेतील आणि जागतिक संघर्षाचे बदलते स्वरूप: संयुक्त राष्ट्र शांतीसेनेची भूमिका या विषयावर मुख्य भाषण देतील.

जनरल एम.एम. नरवणे हे माली, दक्षिण सुदान आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिक मधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांचे फोर्स कमांडर्स आणि रॉयल भूतानी सैन्याचे उप-मुख्य संचालन अधिकारी यांच्याशी 12 एप्रिल 2021 रोजी संवाद साधणार आहेत. ते समारोप समारंभालाही उपस्थित राहतील. ते संयुक्त राष्ट्र ,भारत, बांग्लादेश, भूतान आणि श्रीलंकेच्या सशस्त्र सैन्यासह अमेरिका, ब्रिटेन, तुर्की आणि सौदी अरेबियाच्या पर्यवेक्षकांसह शांतीर ओग्रोसेना,या संयुक्त राष्ट्रच्या अनिवार्य बहुपक्षीय दहशतवादविरोधी सरावात उपस्थित राहतील.

लष्करप्रमुख दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ पीस सपोर्ट अँड ट्रेनिंग ऑपरेशन्स (बिप्सोट) च्या सदस्यांशी संवाद साधतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.